'श्रीपाद सेवा मंडळा'चे मुखपत्र
।। श्रीवामनराज ।।
त्रैमासिक
शक्तिपातयोग-साधनेविषयी सर्वांगीण चिंतन मांडणारे, प्रत्येक साधकाच्या घरी असलेच पाहिजे असे; सुबोध, संग्राह्य, अपूर्व आणि एकमेव मराठी त्रैमासिक.
अधिक माहिती ...
परंपरा
भगवान श्रीसद्गुरु ज्ञानेश्वर महाराज
सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणजे श्रीभगवंतांचेच प्रत्यक्ष अवतार! ‘कळिकळित भूतां’ साठी ज्ञान-योग विभव भांडार खुले करून त्यांना ‘स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती पद’ बहाल करणारे श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणजे सकल विश्वाची माउली!
श्रीभावार्थदीपिका अर्थात् श्रीज्ञानेश्वरी, श्रीचांगदेवपासष्टी, श्रीहरिपाठ व अभंगगाथा हे श्रीमाउलींचे ब्रह्मरसाने ओतप्रोत भरलेले वाङ्मय म्हणजे जणू परममंगल अशा श्रीभगवंतांच्या स्वानंदस्वरूपाचेच प्रकटीकरण होय.
ठराविक लोकसमूहाची मक्तेदारी बनून राहिलेल्या, संस्कृतमध्ये बंदिस्त झालेल्या ज्ञानाला ‘देशाकार लेणे’ चढवून, श्रीमाउलींनी जनसामान्यांसाठी भक्ती-मुक्तीचा मार्ग खुला केला. संपूर्ण जगभर आश्चर्याचा विषय बनून राहिलेल्या वारकरी (भागवत) संप्रदायाला, श्रीमाउलींनी अद्वैत-भक्ती व वैदिक तत्वज्ञानाचा प्रशस्त व सुदृढ पाया घालून दिला.
ठरविलेले कार्य पूर्ण झाल्यावर, वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी श्रीक्षेत्र आळंदी येथे श्रीमाउलींनी संजीवन समाधी घेतली. या घटनेला आज सातशेहून अधिक वर्षे झालेली असली तरी, नित्य ‘अनवरत आनंद’ वर्षविणाय्रा श्रीमाउलींच्या करुणाकृपेची निरंतर अनुभूती भक्तांना अखंड येत असते.
प.पू. सद्गुरु श्री मामा हे श्रीमाउलींचे अनन्य भक्त. श्रीज्ञानेश्वरीचे अंतरंगअधिकारी, गाढे चिंतक-अभ्यासक होते. श्रीज्ञानेश्वरी हा आपल्या संप्रदायाचा प्रमुख अभ्यासग्रंथ. प्रत्यक्ष श्रीमाउलींनी दर्शन-अनुग्रह देऊन प.पू.श्री मामांना पूर्ण कृपा केली होती.
आजमितीस, श्रीमाउलींच्या तत्वज्ञानाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य प.पू. सौ शकाताई व प.पू. श्री शिरीषदादा अत्यंत तळमळीने, सेवाभावाने अखंड करीत आहेत.